1 Chronicles 22

1मग दावीद म्हणाला, “हेच ते परमेश्वर देवाचे मंदिर आहे. इस्राएलांची होमार्पणाची वेदीही इथेच केली जाईल.”

2इस्राएलमध्ये जे परदेशी लोक राहत होते त्या सर्वाना दावीदाने त्याच्या सेवकांना आज्ञा देऊन एकत्र बोलवून घेतले. देवाचे मंदिर बांधण्यासाठी दगडाचे चिरे घडवण्याचे काम त्यांच्यावर सोपवले.

3दावीदाने दरवाजांसाठी खिळे आणि बिजागऱ्यासाठी लागणारे लोखंड पुरवले व त्याने वजन करता येणार नाही इतके पितळ, 4सीदोन आणि सोर या नगरांतील लोकांनी गंधसरूचे पुष्कळ लाकूड दावीदाकडे आणले आणि ते लाकूड तर एवढे आले की त्यांची मोजदाद करणे कठीण होते. 5दावीद म्हणाला, “माझा पुत्र शलमोन अजून तरुण व अननुभवी आहे आणि परमेश्वराचे मंदिर मात्र विशेषतः उत्कृष्ट बांधले गेले पाहिजे, याकरता की सर्व इतर देशात सुप्रसिध्द आणि वैभवशाली असे झाले पाहिजे. म्हणून मी त्याच्या बांधण्याची तयारी करीन.” असे म्हणून दावीदाने आपल्या मृत्यूपूर्वी बरीच तयारी केली.

6मग त्याने आपला पुत्र शलमोन याला बोलावले. इस्राएलचा देव परमेश्वर याच्यासाठी मंदिर बांधण्याची त्याने त्याला आज्ञा दिली. 7दावीद शलमोनाला म्हणाला, “माझ्या मुला, माझा देव परमेश्वर याच्या नावासाठी मंदिर बांधण्याची माझी इच्छा होती. 8पण परमेश्वर माझ्याकडे आला व म्हणाला, तू बऱ्याच लढाया केल्यास आणि त्यात पुष्कळ रक्त पाडले. तेव्हा तुला माझ्सासाठी मंदिर बांधता येणार नाही. कारण तू माझ्यापुढे भूमीवर पुष्कळ रक्त पाडले आहे.

9मात्र तुला पुत्र होईल तो शांतीप्रिय मनुष्य असेल. मी त्याला त्याच्या सर्व शत्रूपासून प्रत्येक बाजूने विसावा देईन. कारण त्याचे नाव शलमोन असे होईल आणि इस्राएलांस त्याच्या दिवसात मी शांतता आणि स्वस्थता देईन. 10तो माझ्याप्रीत्यर्थ मंदिर बांधील. तो माझा पुत्र आणि मी त्याचा पिता होईन. त्याचे राजासन मी इस्राएलावर सर्वकाळापर्यत स्थापित करील.”

11“आता माझ्या मुला, परमेश्वर तुझ्याबरोबर असो व तुला यशस्वी करो. त्याने तुला सांगितल्याप्रमाणे तू परमेश्वर देवाचे मंदिर बांध. 12जेव्हा इस्राएलावर तो तुला अधिकार देईल तेव्हा परमेश्वर देवाचे नियम पाळायला फक्त परमेश्वरच तुला अंर्तज्ञान आणि समजूतदारपणा देवो. 13इस्राएलसाठी परमेश्वराने मोशेला जे नियमशास्त्र सांगितले ते तू न विसरता पाळ म्हणजे तू यशस्वी होशील. बलवान हो व धैर्य धर. घाबरु नको किंवा नाउमेद होऊ नको.

14पाहा, परमेश्वराच्या मंदिरासाठी मी खूप कष्टाने एक लक्ष किक्कार सोने आणि एक किक्कार रुपे आणि पितळ व लोखंड यांचा मोठ्या प्रमाणात साठा करून तयारी केली आहे. मी दगड, लाकूडसुध्दा पुरवले आहे. तू ह्या सर्वात अधिक भर घाल.

15तुझ्याजवळ पुष्कळ कामगार आहेत. पाथरवट, गवंडी आणि सुतार, आणि सर्व प्रकारच्या कामामध्ये कुशल असे हुशार लोक आहेत. 16जे कोणी सोने, रुपे, पितळ, लोखंड यावर काम करू शकतात, अशी असंख्य माणसे तुझ्याबरोबर आहेत. तेव्हा आता कामाला सुरवात कर. परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.”

17दावीदाने इस्राएलामधील सर्व पुढाऱ्यांनासुध्दा आपला पुत्र शलमोन याला सहकार्य करण्याची आज्ञा केली. तो म्हणाला, 18“तुमचा देव परमेश्वर तुम्हासोबत आहे. आणि प्रत्येक बाजूने त्याने तुम्हाला शांतता दिली आहे. कारण त्याने देशातले राहणारे माझ्या हाती दिले आहेत, परमेश्वराच्यापुढे आणि त्याच्या लोकांच्या आता हा देश ताब्यात आला आहे. तेव्हा आता अंत:करणपूर्वक तुम्ही परमेश्वर तुमचा देव याचा शोध करा. उठा व परमेश्वर देवाचे पवित्र मंदिर बांधा. कारण परमेश्वराच्या नावासाठी जे मंदिर बांधायचे आहे त्यात मग परमेश्वराच्या कराराचा कोश आणि देवाची इतर पवित्र वस्तू आणून ठेवा.”

19

Copyright information for MarULB